पुणे: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे (Pune News) कॉर्पोरेशन म्हणजेच महामेट्रोमध्ये (Pune Metro News) नोकरी लागल्याचे खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत महामेट्रो प्रशासनाने सायबर पोलिसांना माहिती दिली असून तरुणांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे. महामेट्रोमध्ये भरती ही कधीही ऑनलाईन थेट होत नाही, तर लेखी, तोंडी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीनंतरच होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Marathi News)

बनावट नियुक्तीपत्र घेऊन तरुण पोहोचले कार्यालयात
अलीकडे काही तरुण नोकरी लागल्याच्या आनंदात महामेट्रोच्या कार्यालयात नियुक्तीपत्र घेऊन दाखल झाले होते. मात्र सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याने अधिकाऱ्यांनी या नियुक्तीपत्रांची तपासणी केली. तपासणीअंती ही सर्व नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केल्यानंतर संबंधित तरुणांनी सांगितले की, ऑनलाईन संकेतस्थळावर पुणे महामेट्रोची भरती सुरू असल्याचा संदेश त्यांना मिळाला होता. त्या संकेतस्थळावर शैक्षणिक आणि वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर सुमारे एका महिन्यात नियुक्तीपत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांची मानसिक फसवणूक
या प्रकारामुळे महामेट्रो स्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महामेट्रोने तातडीने सायबर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मेट्रोच्या लोगोचे हुबेहूब बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महामेट्रोकडून आवाहन
महामेट्रोने स्पष्ट केले आहे की, भरतीची जाहिरात केवळ अधिकृत संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते. महामेट्रोकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क मागितले जात नाही. सोशल मीडियावर किंवा इतर फसव्या संकेतस्थळांवर फिरणाऱ्या भरतीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. शंका असल्यास थेट महामेट्रो कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महामेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.






