Pune : पिंपरी-चिंचवडमधील एसआरए प्रकल्पावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी एका विरोधी नेत्यावर चांगलाच हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस मंचावर असतानाच लांडगे म्हणाले, “एक नेता स्वतःला एसआरएचा बाप समजतोय. आता त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आली आहे.”

लांडगे यांनी आरोप केला की, एसआरए प्रकल्पातील नागरिकांना मतदान न केल्यास धमकावलं जात आहे. “मी सांगतो तेच घर घ्यायचं, नाहीतर अडचण होईल, असा माज काही जण दाखवत आहेत. प्राधिकरण भागात आम्ही एसआरए प्रकल्प सुरू केला, तेच काही लोकांना खुपतंय,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाम शब्दांत इशारा दिला. “हे कायद्याचं राज्य आहे. इथं धमक्यांचं राजकारण चालणार नाही. कुणी धमक्या देत असेल, तर पोलीस त्याला योग्य ती जागा दाखवतील. मी गृहमंत्री असताना अशी हिंमत कुणाची कशी होते?” असा सवाल त्यांनी केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, “एसआरएमध्ये जर कुणी नागरिकांना धमकावत असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. पोलीस यंत्रणा सक्षम आहे. मला वैयक्तिक हस्तक्षेप करण्याची गरज भासणार नाही.” तसेच त्यांनी सांगितलं की, “मुख्य एसआरए संस्थेचा अध्यक्ष मी स्वतः आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त राहावं. जनहिताच्या विरोधात कुणी काम करत असेल, तर १६ जानेवारीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.”

दरम्यान, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टोला लगावला. “निवडणुका जवळ आल्या की काही लोकांचा अचानक आवाज मोठा होतो. आमचं काम बोलतं. जनतेसमोर काम ठेवलं की समोरच्यांकडे उत्तर राहत नाही. काहींना फक्त वाद घालून निवडणूक लढवायची आहे,” असंही ते म्हणाले.





