Pune Crime : पुणे ग्रामीण पोलिसांनी 35 गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दुर्गम भागात घडलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसतानाही पोलिसांनी परिसरातील सुमारे 110 कॅमेऱ्यांच्या फुटेजची पडताळणी केली. या तपासातून ललित खोल्लम आणि नंदलाल होले यांची नावे समोर आली.
आरोपी सोमेश्वरनगर-निंबूत परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी उसाच्या शेतातून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी धनंजय घेवडे यांच्या खुनाची कबुली दिली. तसेच नीलेश सणस याने या गुन्ह्यात आर्थिक मदत केल्याचे समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
तपासादरम्यान मुख्य आरोपी ललित खोल्लम याने ठाणे येथे श्रीकांत वाडेकर आणि त्याची आई रूपाली वाडेकर यांच्या खुनाची कबुली दिली. श्रीकांत वाडेकर यांचे अपहरण करून खून केल्यानंतर मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार, जळालेल्या कपड्यांची राख आणि विहिरीत टाकलेला मोबाईल जप्त केला आहे. मुख्य आरोपीवर खून, दरोडा आणि घरफोडीसह एकूण 35 गुन्हे दाखल असून तो ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईनंतर जामिनावर बाहेर होता.







