Pune Crime: पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तब्बल 3 वर्षे पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अखेर बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे (वय 26, रा. वडारवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. Pune Crime

हेही वाचा- पुढचं पंतप्रधानपद नागपूरला मिळणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे राजकीय बदलाचे संकेत!
हा थरारक प्रकार 25 ऑगस्ट 2022 रोजी ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घडला होता. लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला तुषार हनुमंत हंबीर (वय 35, रा. हडपसर) चालता न येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होता. त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही आरोपींनी धाडसी पद्धतीने रुग्णालयात प्रवेश केला.
रोहित धोत्रेसह एकूण 5 आरोपींनी हंबीरवर तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात हंबीरला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पोलीस गार्डवर तसेच हंबीरच्या मेहुण्यावरही वार करण्यात आले, ज्यात ते दोघे जखमी झाले. दरम्यान, एका आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेनंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एकूण 12 आरोपींचा सहभाग असल्याचा निष्पन्न केले. त्यापैकी 11 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, सर्वांवर MCOCA अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपींपैकी रोहित ऊर्फ तम्मा धोत्रे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
अखेर बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने बड्या शिताफीने अटक करण्यात आले. या प्रकरणाचा पुढाल तपास पोलीस करत आहे.






