Pune Bus Accident: पुणे : पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शिवाजीनगर परिसरातील ई-स्क्वेअर थिएटरजवळ एका लक्झरी बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिली. या धडकेनंतर काही क्षणातच मागून येणाऱ्या एका ट्रकने त्या बसला जोरदार धडक दिली. हा अपघातामुळे सोमवारी सकाळपासून वाहतुक कोंडी दिसून आली त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. Pune Bus Accident

हेही वाचा- गुन्हेगारांची आता खैर नाही! पुणे-पिंपरीतील 7 पोलीस स्टेशन आणि 3 झोन, प्रशासनाच्या हालचालीला वेग
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर थिएटर परिसरात ही बस भरधाव वेगात होती. अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट मेट्रोच्या खांबावर आदळली. बस मेट्रो पिलरला धडकल्यानंतर ती रस्त्यावरच थांबली. त्याच वेळी मागून आलेल्या एका ट्रकला वेळेत ब्रेक न लागल्याने त्याने बसला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, मात्र या अपघातात बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर संबंधित मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात आली. बाणेर विद्यापीठ ते शिवाजीनगर या मुख्य रस्त्यावर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कार्यालयीन वेळेत कामावर निघालेले अनेक नागरिक या कोंडीत अडकून पडले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. रात्रीपासून बस आणि ट्रक रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू आहे. जड वाहने हटवण्यासाठी क्रेनच्या मदतीने प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.






