Politics : मुलींचं शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा मुद्दा असो किंवा प्राध्यापक भरतीचा प्रश्न- निधी नाही म्हणून या सगळ्या गोष्टींना विरोध करणारे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आता पुण्यात नागरिकांना पीएमपीएमएल बस आणि मेट्रोत मोफत प्रवास देण्याची घोषणा करत आहेत. ही घोषणा पूर्णपणे फसवी असल्याची टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Politics)

पुणे महापालिकेत सत्ता येणार नाही, हे माहीत असल्यामुळेच अजित पवार अशा घोषणा करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ते म्हणाले की, योजना ऐकायला चांगली आहे, पण ती प्रत्यक्षात राबवायची असेल तर महायुती सरकारने एकत्र बसून निर्णय घ्यावा लागतो. केवळ ‘क्रेडिट’ घेण्यासाठी मित्रपक्षांना विश्वासात न घेता अशा घोषणा करणं योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. (Politics)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, बिहार निवडणुकीत काँग्रेसनेही अशाच फसव्या घोषणा केल्या होत्या. सरकार येणार नाही, हे माहीत असल्यामुळेच त्या घोषणा केल्या गेल्या. अजित पवार यांनाही पुणे महापालिकेत आपली सत्ता येणार नाही, याची जाणीव आहे, म्हणूनच अशा घोषणा केल्या जात आहेत.
अजित पवार यांनी यापूर्वी 1999 साली मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. पण सत्ता आल्यानंतर ती घोषणा ‘प्रिंटिंग मिस्टेक’ होती, असं सांगण्यात आलं. आताच्या या मोफत प्रवासाच्या घोषणेबाबतही तसाच काही प्रकार होण्याची शक्यता आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
याच वेळी त्यांनी भाजपच्या निवडणूक तयारीबाबत दावा केला. अंतर्गत सर्वेक्षणानुसार भाजपला सध्या 115 जागा मिळतील, आणि प्रदेशाध्यक्षांच्या मायक्रोप्लॅनिंगमुळे हा आकडा 125 पर्यंत जाईल, असं ते म्हणाले. पुण्यात भाजपचाच महापौर होणार असून, विविध प्रवर्गांनुसार उमेदवारांची नावंही जवळपास निश्चित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बस आणि मेट्रो सेवा मोफत करण्याची घोषणा केल्यानं निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र ही घोषणा केवळ दिखाऊ असून प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे.







