Mumbai : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी ते अंबरनाथ या मध्य रेल्वे मार्गावर महिलांशी गैरवर्तन आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन हे प्रकार घडत असल्याने, रेल्वे पोलीस आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल गाड्या आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारी वाढल्याचे बातम्या सातत्याने समोर येत आहे. महिला डब्यात किंवा स्थानकांवर थांबलेल्या महिलांना लक्ष्य करून काही विकृत प्रवृत्तीचे लोक गैरवर्तन करत आहेत. सीएसएमटी-अंबरनाथ मार्गावर झालेल्या एका विशिष्ट घटनेमुळे हा विषय अधिक गंभीर बनला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ या मार्गावर जाणाऱ्या लोकलमध्ये एका महिलेवर दोन तरुणांनी अतिशय गलिच्छ वागत छेडछाड केली. ट्रेन सीएसएमटीवरून सुटताच हे दोघे तिच्यासमोर अश्लील हालचाली करत होते. हा प्रकार पाहून त्या महिलेने लगेच आपल्या नातेवाईकांना फोन करून सगळं सांगितलं.
ट्रेन उल्हासनगर स्टेशनला थांबताच तिचे नातेवाईक आणि काही सहप्रवासी यांनी दोन्ही तरुणांना पकडलं. त्यांना संतापलेल्या लोकांनी चांगलाच समाचार देऊन धडा शिकवला. त्यानंतर आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं. सध्या कल्याण जीआरपीने दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकलने रोज प्रवास करणाऱ्या नोकरदार महिला आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी महिला डब्यांमध्ये साध्या वेशातील अधिक महिला पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. तसेच, स्थानकांवर आणि लोकल डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी आणि आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Mumbai)






