Mumbai : मुंबईतील डोंगरी परिसरात एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. पदपथावर असतानाच अचानक प्रसूती कळा सुरू झालेल्या एका महिलेला, तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन मदतीचा हात दिला. पोलिसांच्या या तत्पर मदतीमुळे आई आणि नवजात बाळ दोघांचेही प्राण वाचले असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही घटना मुंबईतील डोंगरी भागात घडली. पदपथावर असलेल्या एका महिलेला अचानक प्रसूतीच्या तीव्र वेदना सुरू झाल्या. रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना, या संकटाच्या क्षणी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी कोणत्याही वैद्यकीय मदतीची वाट न पाहता, माणुसकीचे कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, महिला पोलिसांनी तत्काळ त्या महिलेला धीर दिला आणि प्रसूतीसाठी लागणारी आवश्यक व्यवस्था केली. त्यांच्या मदतीमुळे काही वेळातच त्या महिलेची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली. त्यानंतर तातडीने आई आणि बाळाला पुढील आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन महिला पोलीस कर्मचारी आणि नवजात शिशूसोबतचा फोटो पोस्ट करत मुंबई पोलिसांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर घटनेबद्दलची माहिती दिली.
Upon learning that a woman had gone into labour on a pavement in the Umarkhadi, Dongri area, officials from @DongariPS immediately rushed to the location. After the delivery, women police personnel from Mobile 5 and 1, along with help from local women, ensured that the mother and… pic.twitter.com/4ikVqUtGu3
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) December 1, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रस्त्यावर बाळाचा जन्म होऊनही, दोघांचा जीव वाचला आणि मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा ‘खाकी वर्दीतील माणुसकी’ सिद्ध केली.






