Manoj jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींचे फोटो समोर आल्यानंतर प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या आरोपींपैकी एक व्यक्ती जरांगे यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे या प्रकरणात अधिकच खळबळ माजली आहे.

या प्रकरणी जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये अमोल खुणे आणि दादा गरुड यांचा समावेश आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याचा आरोप आहे. मनोज जरांगे यांनी स्वतः पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देऊन याबाबत कारवाईची मागणी केली होती.

मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर गंभीर आरोप करताना म्हटले की, त्यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी कुणी अनोळखी व्यक्ती नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. जरांगे यांच्या मते, धनंजय मुंडेंचे कथित पीए कांचन पाटील सतत आरोपींशी संपर्कात होते.

या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठली आहे. जरांगे यांच्या आरोपांनंतर आता सर्वांचे लक्ष मुंडे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. दरम्यान, आरोपींचे फोटो समोर आल्यानंतर त्यातील एका आरोपीचा फोटो थेट मनोज जरांगे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे आरोपी पूर्वी जरांगे यांच्या कार्यकर्त्यांपैकीच असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास जालना पोलीस करत असून, आरोपींशी संबंधित आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे. मनोज जरांगे यांनी घेतलेले आरोपांचे वादळ राजकीय पातळीवर नवीन चर्चा निर्माण करत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा तपास कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







