पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याला ७ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे (वय ६३) आणि दीर सुशील हगवणे (वय २७) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

निलेश चव्हाण हा मुख्य आरोपी शशांक हगवणेचा व्यावसायिक भागीदार आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली. त्याच्यावर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, तिच्या मुलावर अत्याचार केल्याचा आणि तिच्या पालकांना धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, चव्हाणकडे गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे आणि तपासासाठी त्याचा लॅपटॉप व मोबाईल डिव्हाइसेसची फॉरेन्सिक तपासणी करावी लागणार आहे. तसेच, वैष्णवीच्या सासू आणि जाऊच्या कॉल डिटेल्सचीही चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपींवर गंभीर आरोप सिध्द होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी ७ जून २०२५ रोजी होणार आहे. संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणाच्या तपासाकडे लागले आहे.
त्यासोबतच आज या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. त्यावरून वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली या संदर्भातला ठोस पुरावा हाती लागू शकतो. वैष्णवीने ज्या पंख्याला लटकवून गळफास घेतला होता पंखा आज न्यायवैद्यक अहवालासाठी प्रयोगशाळेत अर्थात फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहे. वैष्णवीने 16 मे रोजी घरातील पंख्याला लटकवून टोकाचं पाऊल उचललं होत. त्यानंतर 17 मे रोजी या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. वैष्णवीचं वजन हे 71 किलो असल्याचं पंचनाम्यात नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे तिने ज्या पंख्याला लटकून आत्महत्या केली तो पंखा 71 किलो वजन पेलवू शकतो का? याची तपासणी करण्यासाठी आता आज तो पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.







