लोणी काळभोर, ता. 17: अंगणात (Loni Kalbhor News) रडत असलेल्या मुलीला घरात न घेतल्याचा राग मनात धरून पतीने शिवीगाळ, मारहाण करुन पत्नीला डोक्यात दगड मारल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत महिला जखमी झाली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुजर वस्ती परिसरात शनिवारी (ता.15) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघे नात्याने पती पत्नी असून त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुलगी राहत्या घरामध्ये सायकल खेळत होती. त्यावेळी फिर्यादी घरामध्ये स्वयंपाक करीत होत्या. मुलगी घराबाहेर खेळत असताना मोठमोठ्याने ओरडत होती. तेव्हा ती का ओरडत आहे असे फिर्यादी यांचे पती त्यांना म्हणाले. त्यानंतर फिर्यादी घराबाहेर गेल्या. त्यांनी मुलीला घरात चल म्हणाल्या, परंतु, ती घरात येत नसल्याने सायकल घेवुन घरातील पार्किंगमध्ये लावली व फिर्यादी पुन्हा घरामध्ये गेल्या.
मुलगी घराबाहेर मोठमोठ्याने रडत होती. त्यावेळी फिर्यादी यांचे पती त्यांना म्हणाले की, तु मुलीला घरामध्ये का आणले नाही, व तु तिची सायकल पार्किंगमध्ये लावल्यानेच ती मोठ्याने रडत आहे. असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी म्हणाल्या माझी काहीही चुकी नाही, तुम्ही मला विनाकारण शिवीगाळ करु नका. असे म्हणाल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादी मुलीला घेऊन झालेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी चालल्या होत्या. त्यावेळी आरोपीने धन्वंतरी क्लिनीकसमोर फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारला. फिर्यादी यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. याप्रकरणी 25 वर्षीय फिर्यादीने 38 वर्षीय पतीच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 118(1), 115(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.





