Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. राज्यभरात दीड कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेतून दर महिन्याला 1500 रुपये थेट खात्यात दिले जातात. (Ladki Bahin Yojna)

मात्र डिसेंबर 2025 चा हफ्ता अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. यामागचं कारण म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुका. निवडणुकांमुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असून, त्यामुळे गेल्या महिन्यात हा हफ्ता वितरित करण्यात आलेला नाही.
याआधी सरकारने सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींना दिलासा देत दिवाळी आणि भाऊबीजेला दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले होते. त्यामुळे यंदा मकरसंक्रांतीला म्हणजेच 14 जानेवारी रोजी डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. काही ठिकाणी याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.
मात्र यावर काँग्रेसने आक्षेप घेत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. काँग्रेसचा दावा होता की, राज्यात 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. अशा वेळी 14 जानेवारीला महिलांना दोन महिन्यांचे पैसे दिले, तर त्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो. यामुळे सुमारे एक कोटी महिला मतदार प्रभावित होऊ शकतात, असा युक्तिवाद काँग्रेसने केला होता.

काँग्रेसच्या या निवेदनानंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्याबाबत सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला आहे, याचं स्पष्ट स्पष्टीकरण आयोगाने मागितलं आहे.
मकरसंक्रांतीला पैसे देणार, अशा बातम्या समोर आल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला आहे.
इतकंच नाही, तर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आगाऊ स्वरूपात देण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हणजेच जानेवारी महिन्याचा हफ्ता सध्या देता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे, नियमित किंवा प्रलंबित हफ्ता देण्यास कोणतीही अडचण नाही, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सरकार पुढे नेमका काय निर्णय घेते, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं आहे.







