Ladki Bahin Yojna : ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला थेट 1500 रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीच्या आधीच ही योजना सुरू झाली होती आणि याचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाल्याचंही बोललं जातं. (Ladki Bahin Yojna)

निवडणुकीदरम्यान महायुतीच्या अनेक नेत्यांनी सत्तेत पुन्हा आलो तर लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम 2100 रुपये करू, असं आश्वासन दिलं होतं. पण सत्तेत येऊनही अजून त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र आता या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि यात महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. एकूण 288 पैकी तब्बल 214 नगराध्यक्षपदांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत.
या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, शिवसेनेच्या इतिहासात इतके नगराध्यक्ष कधीच निवडून आले नव्हते. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, आरोग्याच्या योजना राबवण्यात आल्या, याचं मला खूप समाधान आहे. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीने जे अडथळे आणले होते ते सगळे दूर करून महाराष्ट्राला पुढे नेलं, असंही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. अनेकांनी या योजनेला विरोध केला, पण तो मोडून काढून आम्ही ही योजना सुरू ठेवली. कोणताही माई का लाल ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणारच. योग्य वेळी सन्मान निधीत वाढ केली जाईल, अशी ठाम घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.






