नवी दिल्ली : भारतीय टेनिसपटूची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचं समोर आलं असून, पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतलं आहे. आणि त्यांची चौकशी सुरु केली आहे.

ही घटना हरियाणाच्या गुरुग्राममधील सुशांत लोक फेज-२ या पॉश सोसायटीमध्ये घडली. या सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक E-157 मध्ये २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव आपल्या कुटुंबासोबत राहत होती. राहत्या घरातचं वडिलांनी तिच्यावर गोळ्या घातल्या. ज्यात तिचा जागेवरचं मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आरोपी वडिलांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. तसेच हत्येत वापरलेले परवानाधारक रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आले आहे. राधिकाच्या काकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलायं.
पोलिसांनी या घटनेत आरोपी वडिलांची चौकशी केली असता त्यांनी या हत्येची कबुली दिली आहे. त्यांनी चौकशीत हत्येचे कारणही सांगितले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर आता सर्वांनाचं धक्का बसला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘दोन वर्षापूर्वी राधिकाच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तिला प्रॅक्टिस करण्यात अडचण येत होती. आणि म्हणूनच तिने टेनिस अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय वडिलांना आवडला नाही. कारण गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे मुलीच्या कमाईवर जगत आहेस. या संतापात त्यांनी मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.







