पुणे: भाज्या आणि फळे (Food Storage) चांगल्या राहाव्यात म्हणून आपण लगेच फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र, तुम्हाला माहित आहे का, की काही भाज्या अशा आहेत ज्या फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होतात, त्यांची चव बिघडते आणि त्यातील पोषक घटकही नष्ट होतात? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास त्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

काही प्रमुख भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात. बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते, ज्यामुळे शिजवल्यावर बटाटा गोड लागतो. तसेच, टोमॅटो थंड तापमानामध्ये ठेवल्यास त्याची चव बिघडते.
कांदा आणि लसूण या भाज्यादेखील फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. काकडी, वांगी आणि आले देखील थंड तापमानाच्या संपर्कात आल्यास त्यांची चव गमावतात किंवा त्यावर बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेक भाज्या जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील नैसर्गिक पोषक घटक कमी होतात आणि त्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे, आपण कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या नाही, याची योग्य काळजी घेतल्यास भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतील आणि त्यातील पोषणमूल्येही टिकून राहतील.







