Elections 2026 : महापालिका निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरू असतानाच बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप काही ठिकाणी करण्यात आला. या आरोपांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर सविस्तर खुलासा केला आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितले की, “मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई ही पूर्णपणे अमिट आहे. ही शाई वेगळी नसून भारतीय निवडणूक आयोग देशभरात ज्या शाईचा वापर करतो, तीच शाई राज्यातील महापालिका निवडणुकीत वापरली जात आहे.”
आयोगाने पुढे सांगितले की, “जर एखादा मतदार पुन्हा मतदानासाठी आला आणि त्याला मतदानाची परवानगी देण्यात आली, तर त्या मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्षावर थेट कारवाई करण्यात येईल.” (Elections 2026)
“शाई पुसली जात असल्याचा दावा हा संभ्रम”
राज्य निवडणूक आयोगाने शाई पुसली जात असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. “2011 पासून जी शाई वापरली जात आहे, त्याच शाईचा सध्या वापर होत आहे. फक्त ती आता मार्कर पेनच्या स्वरूपात आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत गैरसमज आणि संभ्रम पसरवणे चुकीचे आहे,” असे आयोगाने स्पष्ट केले.

आयोगानुसार, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या वेळीही अशा तक्रारी आल्या होत्या, मात्र शाई पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर ती काढता येत नाही. “कोरस कंपनीचा मार्कर पेन वापरला जात असून, गेल्या 2011 पासून आम्ही एकाच कंपनीचे पेन वापरत आहोत,” असेही आयोगाने सांगितले.
हँडवॉशने शाई निघते? आयोगाचे उत्तर
हँडवॉश किंवा अन्य केमिकल्सचा वापर करून शाई पुसली जाते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आयोगाने हे आरोप फेटाळले. “आमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही मतदान केले आहे. त्यांच्या बोटावरील शाई अजूनही तशीच आहे, ती पुसली गेलेली नाही,” असे आयोगाने सांगितले.
मतदारांना इशारा
निवडणूक आयोगाने दुबार मतदानाबाबत गंभीर भूमिका घेतली आहे. “शाई एकदा ड्राय झाली की ती निघू शकत नाही. शाई पुसली जाणे अपेक्षित नाही. मतदारांनी स्वतःहून शाई पुसू नये. शाई ड्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याआधीच शाई पुसण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मतदारावरही गुन्हा दाखल होऊ शकतो,” असा कडक इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, मतदान प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या वादांमुळे राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाच्या या खुलाशानंतर आरोप-प्रत्यारोपांना विराम मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






