Crime : प्रेमविवाह, संसाराची नवी स्वप्नं आणि नुकतेच घरी आलेले चिमुकले पाऊल… हे सर्व आनंद साजरा करण्याचे वय असतानाच उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील २१ वर्षीय प्रेम अंकुश जाधव या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीचा विरह सहन न झाल्याने प्रेमने रविवारी मध्यरात्री गळफास घेतला. मरण्यापूर्वी त्याने पत्नीला पाठवलेली ऑडिओ क्लिप आता समोर आली असून, ती ऐकून कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

नेमके काय घडले आणि का?
प्रेमने एका वर्षापूर्वी मोठ्या आशेने प्रेमविवाह केला होता. संसाराचा गाडा चालत असतानाच दोन महिन्यांपूर्वी पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली. मात्र, प्रसूतीनंतर तिने सासरी परतण्यास नकार दिला. घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. ‘शिमगा’ या सणाचे औचित्य साधून प्रेमने तिला घरी परत येण्याची वारंवार विनंती केली, पण सासरच्या मंडळींच्या दबावामुळे किंवा अन्य कारणांमुळे पत्नीने येण्यास नकार दिला. आपल्या पोटच्या लेकीचे तोंड पाहायलाही तो आसुसलेला होता, पण तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली.
ती शेवटची ऑडिओ क्लिप आणि काळीज चिरणारा निरोप
आत्महत्येपूर्वी प्रेमने पत्नीला दोन ऑडिओ मेसेज पाठवले. त्यात तो म्हणतो, “तू आईचं ऐकतेयस, पण माझ्या शब्दांना मान देत नाहीस. लेकराचं तोंडही दाखवत नाहीस. मी आता या जगात नसणार, पण लेकराला चांगलं सांभाळ, त्याला चांगले संस्कार दे. माझी काही चूक असेल तर पाया पडतो…” हे शब्द एका हताश पतीचे आणि विरहाने व्याकूळ झालेल्या पित्याचे आहेत.







