पुणे: वडिलोपार्जित संपत्तीच्या विभागणीवरून (Ancestral Property) अनेक कुटुंबांमध्ये भांडण होतात. अनेक कायदेशीर वारसदारांना असे वाटते की, एकदा जमिनीच्या कागदपत्रांवर आपले नाव नोंदवले गेले, की आपण ती मालमत्ता इतरांना न विचारता विकू शकतो. तथापि, कायद्याच्या दृष्टीने हा विषय सोपा नसून, तो गुंतागुंतीचा आहे. कारण बहुतेक वेळा वडिलोपार्जित मालमत्ता ही संयुक्त स्वरूपात असते. अशा संपत्तीमध्ये कुटुंबातील प्रत्येक कायदेशीर वारसाचे अधिकार कायद्याने सुरक्षित ठेवलेले असतात.

महत्त्वाचे नियम:
-
सातबारा उताऱ्यावर नाव असले तरी, ती मालमत्ता संयुक्त स्वरूपात असू शकते.
-
संयुक्त मालमत्ता विकताना, कुटुंबातील इतर कायदेशीर वारसांना माहिती देणे आणि त्यांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे.
-
एखाद्या भागधारकाने एकतर्फी निर्णय घेऊन जमीन विकल्यास, उर्वरित वारस न्यायालयात दाद मागू शकतात आणि त्यामुळे विक्री व्यवहार रद्द होऊ शकतो.
-
वाद, आर्थिक नुकसान आणि कोर्टकचेरी टाळण्यासाठी विक्री करार आणि नोंदणी कागदपत्रांवर सर्व भागधारकांच्या सह्या घेणे महत्त्वाचे आहे.
परवानगी कधी नसते आवश्यक?
मालमत्तेचे अधिकृत ‘विभाजन’ झाले असल्यास आणि ती जमीन कायदेशीर प्रक्रियेनंतर पूर्णतः तुमच्या नावावर वैयक्तिक मालमत्ता म्हणून नोंदवली गेली असल्यास, तुम्हाला इतर वारसांची परवानगी घेणे बंधनकारक नसते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या निर्णयानुसार त्या जमिनीची विक्री करू शकता.






