पुणे: हिवाळ्यात (Winter Diet) सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. मात्र, थंडीचा हा काळ तब्येत सुधारण्यासाठी उत्तम असतो. त्यामुळे शरीराला आतून गरम ठेवणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पौष्टिक पदार्थ आहारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात योग्य बदल केल्यास शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण मिळते.

थंडीत काही पारंपरिक भारतीय पदार्थांचा आहारात समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. तीळ आणि गूळ खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरीत्या उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच, डिंकाचे लाडू हे प्रोटीन आणि मिनरल्सचा मोठा स्रोत असल्याने सांधेदुखीवर उपयुक्त ठरतात आणि हाडांना मजबूती देतात.
थंडीत व्हिटॅमिन आणि खनिजे शरीरासाठी आवश्यक असतात. लिंबू आणि आवळ्यामध्ये मुबलक व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते प्रतिकारशक्ती वाढवून सर्दी-खोकल्यापासून बचाव करतात. मेथी, पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्या व्हिटॅमिन ए, के आणि फोलेटने समृद्ध असतात. तसेच, ओली हळद (करक्यूमिनमुळे) हृदयासाठी आणि रताळी व्हिटॅमिन ए साठी अत्यंत आरोग्यदायी असतात.
दालचिनी, लवंग आणि काळी मिरी मेटाबॉलिझम वाढवतात, तर जिरे पचनक्रिया सुधारते. लसूण चटणी शरीराला उष्णता देते. याशिवाय, बदाम आणि अंजीर यांसारखे सुकामेवा हिवाळ्यात ऊर्जा आणि उष्णता देतात.







