पुणे: काही वर्षांपूर्वी ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारखी धान्ये खाणे लोक टाळत असत. गव्हाचे उत्पादन वाढल्याने या पारंपारिक धान्यांना आहारात दुय्यम स्थान मिळाले होते. मात्र, आता याच धान्यांचे आश्चर्यकारक आरोग्यदायी गुणधर्म अनेकांनी ओळखले आहेत. आज नाचणीला ‘सुपरफूडचा’ दर्जा मिळाला असून, आहारतज्ज्ञही लोकांना आहारात नाचणीचा समावेश करण्याचा सल्ला देत आहेत.

नाचणीचे आश्चर्यकारक फायदे:
- नाचणी (रागी) हे एक असे धान्य आहे जे शरीराला संपूर्ण पोषण पुरवते. हे नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त आहे. नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- नाचणी कॅल्शियमचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये 344 मिग्रॅ कॅल्शियम असते, जे तांदळापेक्षा 10 पट जास्त आहे. यामुळे लहान मुलांच्या हाडांच्या विकासाला आणि वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिससारखे हाडांचे आजार टाळण्यासाठी मदत होते.
- नाचणीमध्ये असलेले फायबर तसेच फायटिक ॲसिड आणि पॉलीफेनॉल खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. हे हृदयविकारांना प्रतिबंध करते आणि रक्तदाबाची (BP) पातळी नियंत्रित ठेवते.
- नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणी खूप उपयुक्त आहे. यामुळे थकवा दूर होतो आणि कार्यक्षमता वाढते.
- नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
नाचणीचे सेवन अनेक प्रकारे केले जाऊ शकते. नाचणीची भाकरी, आंबील, हलवा, खीर किंवा खिचडी बनवता येते. याशिवाय, नाचणीचे पीठ हे मफिन्स, पॅनकेक्स आणि कुकीज बनवण्यासाठीही वापरले जाते.







