मुंबई: मुंबईत शनिवारी २० डिसेंबर रोजी (Nora Fatehi Car Accident) बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार नोरा फतेही हिचा दुपारी ४ वाजेच्या सुमारास अंधेरीतील लिंक रोडवर भीषण अपघात झाला. नोरा ही अमेरिकन डीजे डेव्हिड गुएटाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना एका मद्यधुंद चालकाने तिच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नोराच्या डोक्याला मार लागला आणि तिच्या कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अपघात झाल्यानंतर नोराच्या टीमने तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले, जेणेकरून कोणतीही अंतर्गत दुखापत झाली नसल्याची खात्री करता येईल. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे नोराने सनबर्न फेस्टिव्हलमधील परफॉर्मन्स रद्द न करण्याचा निर्णय घेतला. तिने त्याच संध्याकाळी डेव्हिड गुएटाच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
या घटनेनंतर नोराने स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल माहिती देतानाच, मद्यपान करून गाडी चालवू नका असे आवाहनही चाहत्यांना केले आहे. लवकरच नोराचे डेव्हिड गुएटा आणि सियारा यांच्यासोबतचे एक नवीन आंतरराष्ट्रीय गाणे प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.







