Dhurandhar 3 : ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्साह वाढताना दिसत आहे. 19 मार्च रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर आला असून चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ सिनेमाने मोठं यश मिळवलं होतं. त्यामुळे दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचं चित्र दिसत आहे.

अभिनेता रणवीर सिंग याची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली आहे. कथा, अॅक्शन आणि कलाकारांच्या अभिनयामुळे सिनेमा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या पोस्ट-क्रेडिट सीनमुळे प्रेक्षकांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
या पोस्ट-क्रेडिट सीनमुळे ‘धुरंधर 3’ बद्दल चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर काही ठिकाणी हा सिनेमा 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी पुढील भागाबद्दल वेगवेगळ्या कल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे.
मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निर्मात्यांकडून ‘धुरंधर 3’ बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सिनेमातील पोस्ट-क्रेडिट सीन हे फक्त पुढील कथेबाबत संकेत देणारे असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, ‘धुरंधर’ सिनेमाने देशात 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती, तर जगभरात 1300 कोटींचा टप्पा पार केला होता. ‘धुरंधर 2’ नेही चांगली सुरुवात केली असून चार दिवसांत देशात 442.72 कोटी आणि जगभरात 500 कोटींची कमाई केली आहे. येत्या काळात हा सिनेमा किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







