पुणे : ख्रिसमस सन साजरा करण्यासाठी कुटुंबातील सर्व मंडळी बाहेर गेल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरातील तब्बल २५ लाखाचे हिऱ्यांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना मोहम्मदवाडीतील न्याती व्हिक्टोरीया हाऊस नंबर ३२ येथे शनिवारी (ता.२४) रात्री घडली आहे.
याप्रकरणी एका ४७ वर्षीय महिलेनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून चोरटे त्यांच्या घराच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील चढले. तेथे त्यांनी बेडरूमच्या खिडकीचे दोन गज तोडून ते वाकवून खिडकीवाटे आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी तिजोरी चोरट्यानी तोडून त्यातील १२ हजारांची रोकड आणि हिऱ्यांचे दागिने असता २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, फिर्यादी घरी परतल्यानंतर त्याच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.