Pune Crime : होळीच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत उच्चभ्रू होंडा सिटी कारमधून अवैध गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. ढोबरवाडी, घोरपडी परिसरातून तब्बल 420 लिटर हातभट्टी दारूसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे Rs 2,42,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविवारी (02/03/2026) होळी निमित्ताने हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, होंडा सिटी कारमधून गावठी दारू विक्रीसाठी आणली जात आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित वाहनाला ढोबरवाडीत अडवले. तपासणीदरम्यान कारमध्ये काळ्या आणि निळ्या रंगाचे 35 लिटर क्षमतेचे 12 कॅन आढळले. त्यात एकूण 420 लिटर तयार हातभट्टी दारू होती.
याप्रकरणी लियाकत रोहीत अब्बासी (32, रा. ढोबरवाडी) आणि समीर संजय राठोड (23, रा. शिंदवणे, हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत होळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गावठी दारूची मागणी वाढत असल्याने ही खेप आणल्याची कबुली आरोपींनी दिली. कार क्रमांक MH 12 DS 5062 ही देखील जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी वानवडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पुणे शहर पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. होळीच्या काळात अवैध दारूविक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






