Mumbai : आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तीव्र होत असतानाच, त्याचे पडसाद देशांतर्गत सुरक्षेवरही उमटू लागले आहेत. मुंबईतील काही तरुण इंटरनेटच्या माध्यमातून आयएस आणि इतर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची गंभीर माहिती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) ला मिळाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या माहितीच्या आधारे ATS ने कुर्ला आणि गोवंडी परिसरातील वस्त्यांमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटनुसार, काही तरुण ऑनलाइन माध्यमातून दहशतवादी विचारधारेशी जोडले जात असल्याचे संकेत होते. हे तरुण विदेशात बसलेल्या “हँडलर्स”च्या संपर्कात असून, सोशल मीडिया, एन्क्रिप्टेड अॅप्स आणि ऑनलाइन चॅनेल्सद्वारे कट्टरतावादी साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात होते. या साहित्याच्या माध्यमातून तरुणांची मानसिकता बदलण्याचा आणि देशविरोधी विचार रुजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर ATS च्या विक्रोळी, काळाचौकी आणि नागपाडा युनिट्सने सोमवारी सायंकाळी संयुक्तपणे कुर्ला आणि गोवंडी भागात छापे टाकले. अनेक तरुणांची चौकशी केल्यानंतर 3 जणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यानंतर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे हस्तगत करण्यात आली. प्राथमिक तपासात या उपकरणांमध्ये देशविरोधी, भडकावणारे आणि बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित ऑनलाइन मजकूर आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या तरुणांचा थेट दहशतवादी कारवायांशी संबंध आहे की ते केवळ ऑनलाइन कट्टरतावादाने प्रभावित झाले आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. हस्तगत केलेल्या डिजिटल साधनांच्या फॉरेन्सिक तपासातून आणखी कोणकोण या नेटवर्कशी जोडलेले आहेत, हे उघड होण्याची शक्यता आहे. ही घटना ऑनलाइन कट्टरतावाद हा किती गंभीर धोका ठरू शकतो, याचे स्पष्ट उदाहरण मानली जात आहे.
दरम्यान, आखाती देशांतील युद्धाचा फटका केवळ सुरक्षेपुरता मर्यादित न राहता अर्थव्यवस्थेवरही बसू लागला आहे. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर येथून होणारी कृषिमालाची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. भारताच्या एकूण कृषी निर्यातीपैकी सुमारे 80 टक्के माल आखाती देशांमध्ये जातो. युद्धस्थिती कायम राहिल्यास येत्या हापूस आंबा हंगामावर मोठे संकट येण्याची भीती निर्यातदार व्यक्त करत आहेत.
एकीकडे अंतर्गत सुरक्षा धोक्यात येण्याची चिन्हे आणि दुसरीकडे आर्थिक फटका या दुहेरी आव्हानांमुळे आखाती युद्धाचे परिणाम महाराष्ट्रासाठी अधिक गंभीर ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.







