Crime : बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच केज तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबातीलच विश्वासू नात्याचा गैरफायदा घेत 50 वर्षीय चुलत्याने 19 वर्षीय विवाहित पुतणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना तब्बल 5 महिन्यांनंतर उघडकीस आली असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपीने पाण्यातून गुंगीचं औषध देत पीडितेला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. इतकंच नव्हे, तर “ही गोष्ट कुणाला सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवघेणी इजा करीन” अशी धमकी देत तिला गप्प बसण्यास भाग पाडलं. कुटुंबातील व्यक्तीकडून आलेल्या या भीतीमुळे पीडितेने दीर्घकाळ ही बाब दडवून ठेवली.
परंतु काही दिवसांनी माहेरी आल्यानंतर, मानसिक ताण सहन न झाल्याने तिने अखेर आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात आरोपी चुलत्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे.







