निमोणे : “तुमच्या गावातील रेणुका आणि विजय (दोन्ही नावे बदललेली आहेत) एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांच्या जन्मलेल्या नवजात बाळालाही एड्स आहे,” अशी माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच एका निष्पाप कुटुंबाच्या जीवनात अकल्पनीय संकट ओढवले. बाळंतपणाच्या तपासणीत हा संसर्ग उघड झाल्यानंतर त्यांची सुरू झालेली ससेहोलपट आजही सुरूच आहे.

शिरूर तालुक्यातील एका गावात 19–20 वर्षांचा तरुण सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याच माध्यमातून रेणुका आणि विजय यांची ओळख झाली. ओळखीतून प्रेम, आणि प्रेम विवाहापर्यंत दोघांचा प्रवास झाला. राजा-राणीप्रमाणे संसार फुलत होता. यथावकाश रेणुकाला दिवस गेले. मात्र, प्रसूतीच्या वेळी करण्यात आलेल्या नियमित तपासणीत तिच्या रक्तामध्ये एचआयव्ही संसर्ग असल्याचे समोर आले. त्यानंतर विजय आणि बाळाचे नमुने तपासले असता तिघेही बाधित असल्याचे स्पष्ट झाले. काही क्षणांतच त्यांच्या आयुष्याचे किल्ले कोसळून पडले.
डॉक्टरांनी त्यांना आधार दिला. “वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली आहे, औषधोपचार घ्या, योग्य काळजी घेतली तर आयुष्य जगता येईल,” असे सांगून त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दोघांनीही वास्तव स्वीकारत आजचा दिवस आपल्या हातात आहे, अशी उमेद धरली.
मात्र गावात पोहोचायच्या आतच वैद्यकीय विभागातील एका व्यक्तीने ही गोष्ट उघड केली. गावभर त्यांच्या आजाराची चर्चा सुरू झाली आणि गावकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. ओली बाळांतीण असलेली रेणुका एकटीच सर्व सांभाळत आहे. तिच्या विचारपूसालाही कोणी जात नाही. कालपर्यंत आधार देणारे लोक आता वाट वाकडी करून निघून जातात.
गावातील काही मंडळी त्यांच्या दु:खाचे भांडवल करत चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. एखाद्याच्या आयुष्यावर आपल्या बोलण्याचा किती दुष्परिणाम होतो, याची जाणीव त्यांना नाही. आज प्रत्येक आजारावर औषध आहे, परंतु लोकांच्या जुनाट विचारांवर नाही, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली.
गावकऱ्यांच्या अज्ञानातून, गैरसमजातून आणि सामाजिक बहिष्कारातून हे तीन निष्पाप जीव नाहक यातना भोगत आहेत. औषधोपचार असूनही समाजाच्या वागणुकीने निर्माण केलेला हा “मानसिक आजार” मात्र त्यांच्यासाठी अधिक घातक ठरत आहे.







