सातारा: सातारा जिल्ह्यातील (Satara News) फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी (Faltan Docor Suicide) अटकेत असलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (PSI Gopal Badane) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, काही कठोर अटीही घालण्यात आल्या आहेत. (Faltan News)

23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली होती. बदने मागील पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता.
या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले ते मृत्यूपूर्वी लिहिलेल्या नोटमुळे. संबंधित डॉक्टरने आपल्या हातावरच काही वाक्ये लिहून दोन्ही आरोपींनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे पोलिस यंत्रणा आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. आरोपीने साक्षीदारांवर कोणताही दबाव टाकू नये, पुराव्यात फेरफार करू नये, तसेच प्रत्येक सुनावणीला हजर राहणे बंधनकारक असेल. याशिवाय तपास अधिकाऱ्यांना ओळखपत्र, पत्ता आणि नातेवाईकांची माहिती देणेही आवश्यक करण्यात आले आहे. अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सत्य काय आहे हे पुढे स्पष्ट होणार आहे. मात्र, पाच महिन्यांच्या कोठडीनंतर मिळालेल्या या जामिनामुळे प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेचे केंद्रस्थान मिळवले आहे.







