अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्ट्यांचा आनंद साजरा (Ahilyanagar Accident) करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांवर भीषण अपघाताने काळाने घाला घातला आहे. नववी-दहावीत शिकणाऱ्या 7 मित्रांची कार जामखेड-कर्जत रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी अकलूज येथील वॉटर पार्कला जाण्यासाठी निघाले होते. मात्र शिंदेवाडी फाट्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वेगात असलेली कार रस्त्यावरून खाली जाऊन एक-दोन वेळा उलटली. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि आत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणे कठीण झाले.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून आसपासच्या शेतातील आणि गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जीवाची पर्वा न करता कारमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. इतर विद्यार्थ्यांवरही उपचार सुरू आहेत. ही बातमी समजताच पालक आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलांची अवस्था पाहून अनेक पालकांना अश्रू अनावर झाले.
सध्या पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून, वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण आणि रस्त्याची स्थिती यांचा अभ्यास केला जात आहे.






