Nagpur Crime : नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात होळीच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 17 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या (Nagpur Murder) करण्यात आली. या हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाले असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास नवीन कामठी भागातील ड्रॅगन पॅलेस टेम्पल समोरील परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान शौकत अली (वय 17, रा. कमसरी बाजार, कामठी) हा आपल्या मित्रांसह त्या ठिकाणी गेला होता. मोहित दहाट (वय 17) आणि यश गजभिये (वय 19) हे त्याच्यासोबत होते. काही तरुणांनी फोन करून त्यांना तेथे बोलावले होते. तेथे आधीपासून 8 ते 10 जण उपस्थित होते. अरमानने आपल्या बहिणीला संदेश का पाठवले, यावरून दोन्ही गटांत वाद झाला. हा वाद अचानक वाढला आणि अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्राने अरमानवर हल्ला केला. त्याच्या पोटावर आणि डोक्यावर वार करण्यात आले.
अरमानला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या मोहितवरही चाकूने वार करण्यात आले. यशलाही गळ्याजवळ दुखापत झाली. तिघे जखमी अवस्थेत पडले असताना आरोपी तेथून पळून गेले. जखमींना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर अरमानला मृत घोषित केले. मोहितला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर यशवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

