Amravati Crime : अमरावती : जनगणनेचे काम करण्यासाठी आलो आहोत अशा भुलथापा देत नायब तहसीलदारांच्या पत्नीला लुटल्याची घटना अमरावतीत घडली आहे. दोन अज्ञात तरुणांनी चाकुचा धाक दाखवत पाच लाखांची लूट केली आहे. दिवसाढवळ्या राठी नगर परिसरात हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती शहरातील नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच असताना जनगणनेच काम करायला आल्याचे भासवत दोन अज्ञात तरुणांनी तहसीलदार पत्नीला चाकूचा धाक दाखवून पाच लाखांची लूट केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आधार कार्ड दाखवण्यास सांगितले अन्…
प्रशांत अडसूळ यांच्या पत्नी घरी एकट्याच असताना दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून घरी आले. त्यांनी आम्ही जनगणनेच काम करायला आलो आहोत, असं सांगीतले. महिला विश्वास बसावा यासाठी त्यांनी तिला आधार कार्ड दाखवण्यास सांगितले. आधार कार्ड आणण्यासाठी ती घरात जाताच तिला चाकूचा धाक दाखवून घरात बांधून ठेवले व घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पाच लाखांचा ऐवज या चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटून नेला.
अडसूळ यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक देखील रवाना केलेले आहे. घरात येताना हे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मात्र तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे या चोरट्यांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.