पुणे: ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा (Aaple Sarkar Portal) अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने डिजिटल (Online Digital Certificate) माध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद नाशिक (Birth Certificate Online) अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या एकूण 7 महत्त्वाच्या (Death Certificate Online) सेवा आता शासनाच्या अधिकृत ‘आपले सरकार’ या ऑनलाइन (Marriage Registration Online) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.

डिजिटल महाराष्ट्र या संकल्पनेनुसार नागरिक-केंद्रित सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने पावले उचलत आहे. यापूर्वी विविध दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी ग्रामीण नागरिकांना ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. कागदपत्रांची पूर्तता, अर्जाची चौकशी आणि मंजुरीसाठी लागणारा वेळ यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. मात्र आता ‘आपले सरकार’ पोर्टलवरील या नव्या डिजिटल सेवांमुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या ऑनलाइन अर्ज सादर करू शकणार आहेत. अर्ज केल्यानंतर त्याची सद्यस्थिती, प्रक्रियेतील टप्पे आणि मंजुरीची माहिती ऑनलाइनच पाहता येणार आहे. त्यामुळे अर्जदाराला कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज कमी होणार असून सेवा प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, आपले सरकार पोर्टलवरील सेवा नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डिजिटल माध्यमांचा स्वीकार केल्यास शासकीय कामकाज अधिक वेगवान होईल आणि नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढेल.

सध्या या पोर्टलवर जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीकडून येणे बाकी नसल्याचा दाखला, नमुना क्रमांक 8 चा उतारा तसेच निराधार असल्याचा दाखला या 7 सेवा उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून शासकीय सेवा अधिक जलद आणि प्रभावीपणे मिळणार आहेत.






