हडपसर: संबळ हे वाद्य अतिशय पवित्र व पारंपरिक आहे. ढोल ताशा पथकांमध्ये संबळाचे वादन होणे हे संस्कृतीवर्धनाचे प्रतीक आहे. पारंपरिक वाद्यांना संस्कृतित मानाचे स्थान आहे. नव्या पिढीकडून या संस्कृतीचे जतन होत आहे, ही बाब समाधानकारक आहे. उत्सव व परंपरा यांचा अभिमान बाळगावा व त्याचे पावित्र्य राखावे. असे आवाहन डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी केले.

खंडेरायाच्या दारात सर्वाधिक मानाचे स्थान असलेले संबळ या वाद्याचा हडपसर येथील रुद्रतेज ढोल पथकामध्ये यावर्षी समावेश करण्यात आला व त्याचे वादन जेजुरी गडावर करण्यात आले. यावेळी श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्या शुभहस्ते संबळ या वाद्याचे पूजन करण्यात आले.यावेळी देवसंस्थानचे अधिकारी, सेवेकरी, पुजारी यांसह संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड,अध्यक्ष पंकज रंभोर ,उपाध्यक्ष सुनील माळी, ज्ञानेश्वर माऊली कुदळे,यश राऊत, पार्थ वाघमारे,कपिल गायकवाड, मंगेश मेमाणे,आशिष मगर,पोपट फडतरे,ओंकार मांगडे,कल्पेश बारवकर,मयुर चांदगुडे उपस्थित होते.
खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये शंखनाद करून वातावरण भक्तीमय, चैतन्यमय करण्यात आले. त्यानंतर श्री मार्तंड देव संस्थांनच्या गडकोट परिसरामध्ये रुद्रतेज प्रतिष्ठानच्या ५१ वादकांनी खंडेरायाच्या चरणी वादन सेवा केली. ढोल, ताशा, झांज आणि या पथकात पहिल्यांदा समाविष्ट झालेले संबळ या पारंपारिक वाद्यांच्या ध्वनीमुळे जेजुरी गडावर भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण तयार झाले होते.







