बावडा : इंदापूरमध्ये चोरटयांनी चक्क दिवसाढवळ्या घराचे पत्रे आणि अँगल काढून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने इंदापूर परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. ही घटना इंदापूर तालुक्याच्या रेडा गावात घडली.

रेडा गावात राहणाऱ्या अलका कृष्णा मोहिते या महिलेच्या घरात ही चोरी झाली आहे. अलका कृष्णा मोहिते या आषाढी एकादशीला पंढरपूरला गेल्या होत्या. यादरम्यान, दिवसा एका चोरट्याने अल्का यांच्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. घरात किमती वस्तू न मिळाल्याने चोरटयांनी चक्क घरातील सामानासह घरावरचे पत्रे, लोखंडी अँगलच चोरून नेले. चोरटयांनी तब्बल 9600 किमतीचे साहित्य चोरले. ही चोरी दिवसा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अल्का या पंढपूरवरून परत घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं समजलं. त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार दिली असून, शेजाऱ्यांनी ही चोरी करताना आरोपींना पाहिले होते. त्यानुसार, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भरत जाधव याप्रकरणाचा तपास करत आहे.
दरम्यान, नुकतीच एक घटना समोर आली होती. पुण्यातील मंचर येथे राहणाऱ्या 80 वर्षीय महिलेचं घरचं चोरीला गेले आहे. शकुंतला शिवाजी बागल असं या वृद्ध महिलेचं नाव असून, शकुंतला या आपल्या मुलीकडे पुण्याला उपचारासाठी गेल्या होत्या. काही दिवसांनी त्या आपल्या घरी परत निघाल्या मात्र, घरी येताच त्यांना धक्का बसला. त्याचं घरच जागेवरून गायब झालं होत. महिलेने याची तक्रार पोलिसात दिली असून, लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी महिलेने केली आहे. चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, नागरिकांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे.







