Pune : पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असताना, चाकण-महाळुंगे एमआयडीसी परिसरात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. या आरोपीकडून चोरीच्या 4 दुचाकी आणि घरफोडीतील मुद्देमाल असा एकूण सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय 20) हा मूळचा नेपाळचा असून सध्या भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत राहत होता. पोलिसांच्या तपासात तो यापूर्वीही गुन्हेगारीत सक्रिय असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे, त्याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन या गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
महाळुंगे एमआयडीसी हा औद्योगिक पट्टा असल्याने येथे दररोज हजारो कामगार आणि वाहनांची वर्दळ असते. याच गर्दीचा फायदा घेत आरोपीने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींची निवड करून चोरी केली. मागील काही आठवड्यांत 3-4 तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले.
चौकशीदरम्यान आरोपीने 4 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, एका घरफोडीचा गुन्हाही त्याने केल्याचं उघड झालं. या घरफोडीतून चोरलेलं सोन्याचं पदकही पोलिसांनी जप्त केलं आहे.







