विशाल शिंदे

पुणे: राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी (ता. भोर) परिसरात तांब्याच्या वायरची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी गावच्या हद्दीतील सिमेंट कंपनीच्या बाहेरील उघड्या शेडखालील पॅसेजमध्ये मोकळ्या जागेत ठेवलेली सावली कॉपर कंपनीची तांब्याची वायर अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. ही घटना २२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते २३ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चोरीस गेलेली वायर सुमारे १०३ किलो वजनाची असून तिची अंदाजे किंमत ९२ हजार ७०० रुपये इतकी आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. औद्योगिक व मोकळ्या जागांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने संबंधितांनी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






