बारामती: बारामती तालुक्यातील सहकार (Sunetra Pawar) क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा (Malegaon Sugar Factory) पेच अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून या निर्णयामुळे बारामतीच्या सहकार राजकारणात पुन्हा एकदा त्यांचे नेतृत्व अधोरेखित झाले आहे.

कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी 12 मार्च रोजी विशेष निवडणूक प्रक्रिया पार पडली. बारामतीचे प्रांताधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. दुपारी कारखान्याच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मुळात या पदासाठीची निवडणूक 1 मार्च रोजी होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित असल्याने ही प्रक्रिया अचानक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यात या निवडणुकीबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर प्रशासनाने 12 मार्च ही नवी तारीख निश्चित केली आणि आज शांततेत ही प्रक्रिया पूर्ण झाली.
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातील महत्त्वाचा सहकारी उद्योग मानला जातो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी या कारखान्याचा थेट संबंध असल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. कारखान्याच्या कारभारात सातत्य राहावे तसेच आधुनिकीकरणाच्या विविध प्रकल्पांना वेग मिळावा यासाठी सुनेत्रा पवार यांनीच ही जबाबदारी स्वीकारावी, असा आग्रह संचालक मंडळातील सदस्यांनी धरला होता.
संचालकांच्या या विनंतीला मान देत सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्यास संमती दर्शवली. आगामी काळात कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल असे निर्णय घेणे हे प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
या निवडीमुळे बारामतीतील सहकार क्षेत्रात स्थैर्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून कारखान्याच्या पुढील विकासकामांना वेग मिळेल, अशीही चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.







