पुणे: शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर अद्याप कायम असून मंगळवारी सकाळी आणखी एक बिबट्या वन विभागाने जेरबंद केला आहे. बिबट्यांना पकडण्यासाठी वन खात्याने तालुक्यात विविध ठिकाणी पिंजरे लावले असून आतापर्यंत एकूण 29 बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत.

चांडोह येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला. ही मादी बिबट्या असून तिचे वय सुमारे 3 वर्षे आहे. तिला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका वनाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील फाकडे आणि चांडोह या भागांत सोमवारी दोन बिबटे जेरबंद करण्यात आले होते. बिबट्यांच्या हल्ल्यात दोन मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने अधिक खबरदारी घेत विविध ठिकाणी पिंजरे लावले आहेत. फाकडे येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात 6 वर्षांची मादी बिबट्या सापडली. तसेच चांडोह येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात 4 वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाली. या दोन्ही बिबट्यांना देखील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांतील वन परिक्षेत्रात मागील दीड महिन्यात वन विभागाने एकूण 68 बिबटे पकडले आहेत. जुन्नर वन परिक्षेत्रातील पिंपरखेड आणि जांबूत गावांमध्ये एका बिबट्याने तीन जणांचा बळी घेतल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांनी पुणे–नाशिक महामार्गावर आंदोलन केले होते. या घटनेची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने वन विभागाला बिबट्यांना पकडण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

सुरक्षितता उपाययोजनांतर्गत वन विभागाने 400 पिंजरे, 400 आपदा मित्र, अतिसंवेदनशील गावांत बिबट कृती दल स्थापन केले आहे. तसेच 3300 नेक गार्डचे वाटप करण्यात आले असून 5 ठिकाणी अनायडर्स मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत. मेंढपाळ आणि ऊसतोड कामगारांसाठी 410 सौर दिवे आणि 410 टेंटचे वाटप करण्यात आले आहे. 24 तास मदत कक्ष सुरू करण्यात आले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जलद बचाव पथके तयार करण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे दीड महिन्यात 68 बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
मार्च महिन्यापासून बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत देण्यात आली आहे. तसेच 2020 पासून आतापर्यंत 185 बिबट्या बछड्यांचे पुनर्मीलन घडवून आणण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.






