पुणे: पुणे-सोलापूर (Pune News) महामार्गावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. इंदापूर तालुक्यातील ‘डाळज नंबर २’ जवळ झालेल्या या अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचाही यात समावेश असल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे लेनवरून एक आयशर टेम्पो (MH 13 CU 5163) जात असताना अचानक त्याचे टायर पंक्चर झाले. चालकाने हा टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला, मात्र तो अत्यंत धोकादायक स्थितीत होता. याच दरम्यान, पाठीमागून वेगाने येणाऱ्या कार चालकाला टेम्पो दिसून न आल्याने इको कारच्या (MH 12 XE 8816) चालकाचा ताबा सुटला आणि ही कार थेट उभ्या असलेल्या टेम्पोवर जाऊन आदळली.
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारमधील सहा प्रवाशांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आदिती अमर हातेकर (२५ वर्षे), सखुबाई ईश्वर गेजगे (६० वर्षे) आणि अवघ्या दोन वर्षांचा जय अमर हातेकर यांचा समावेश आहे. कारचालक कबीरदास गेजगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर दोन प्रवासी सुदैवाने किरकोळ जखमी झाले आहेत.






