पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून सामाजिक बदलाची एक नवी आणि सकारात्मक वार्ता समोर आली आहे. शेतजमिनीवर आता केवळ पुरुषांची मक्तेदारी न राहता त्यावर महिलांनाही समान हक्क मिळावा यासाठी शेत दोघांचे हे विशेष अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीच्या सातबारा उताऱ्यावर पतीसोबतच पत्नीच्या नावाची अधिकृत नोंद करणे हा आहे.

आतापर्यंत सुमारे 362 महिलांनी अर्ज केला असून 150 महिलांच्या नावांची नोंद सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.
ग्रामीण भागात शेतीची सुमारे 70 टक्के कष्टदायक कामे महिलाच करतात, मात्र जमिनीची मालकी त्यांच्याकडे नसते. महाराष्ट्र शासनाची लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत हा सकारात्मक बदल केला जात आहे. पुरुषाचे निधन झाल्यावरच महिलेचे नाव जमिनीवर लावले जात असे. मात्र अनेकदा आर्थिक अडचणी किंवा कर्जबाजारीपणामुळे घरातील पुरुषाने परस्पर जमीन विकल्यास महिलांच्या हक्काचे मोठे नुकसान होते. अशा घटनांना आळा बसून महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने आपले हक्क मिळवण्यासाठी पुढे येत आहेत. या बदलामुळे भविष्यात महिलांना जमिनीचे कायदेशीर मालक म्हणून सन्मान मिळणार आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या या प्रक्रियेत पुरंदर तालुक्याने संपूर्ण जिल्ह्यासमोर एक आदर्श ठेवला आहे.







