पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी सभांचे आयोजन करून जोरदार प्रचार केला. अशातच कात्रज परिसरात झालेल्या एका जाहीर सभेची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या सभेच्या व्यासपीठावर अजित पवार येण्यापूर्वी कुख्यात गुन्हेगार आणि राष्ट्रवादीचा उमेदवार बापू नायर याने भाषण केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

व्यासपीठावरून बोलताना बापू नायर याने स्वतःची बाजू मांडताना माध्यमांना काही सवाल केले. आपण पहिल्यांदाच अशा प्रकारे सभेला संबोधित करत असल्याचे सांगत त्याने आपल्या उमेदवारीवरून होणाऱ्या टीकेवर भाष्य केले. जर एखाद्याला गुन्हेगारी जगतातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचे असेल, तर त्याला विरोध का केला जातो, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
आपल्या भागातील समस्या मांडताना त्याने ड्रेनेजचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि तरुण पिढीला लागलेले नशेचे व्यसन यावर बोट ठेवले. स्थानिक नेते श्रीमंत होत चालले असून सर्वसामान्यांचे प्रश्न कायम आहेत, त्यामुळे आपल्याला कामाची संधी द्यावी, अशी विनंती त्याने मतदारांना केली.
बापू नायर हा मुळचा केरळचा असून पुण्यात एका मित्रासाठी केलेल्या भांडणामुळे तो गुन्हेगारीकडे वळला होता. 2011 मध्ये मिरवणुकीत झालेल्या वादाचा बदला म्हणून बापू नायर टोळीने बैजू नवघणेची हत्या केल्यानंतर तो पुण्याच्या टोळीयुद्धात चर्चेत आला होता.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात बापू नायरचा उल्लेख टाळत पुण्याच्या भविष्यातील विकासावर लक्ष केंद्रित केले. ही निवडणूक केवळ एखाद्या वॉर्डची नसून पुण्याच्या पुढील अनेक वर्षांचे भवितव्य ठरवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना दिलेल्या संधीमुळे निकालवर काही परिणाम होतो का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






