पुणे: बारावीच्या (HSC Hall Ticket) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार, सोमवार म्हणजेच 12 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना त्यांची हॉलतिकीटं मिळणार आहेत. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या लॉगिनवरून ही प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येतील.

विद्यार्थ्यांनी ही हॉलतिकीटं मिळवण्यासाठी कोणतेही जादा पैसे देण्याची गरज नाही. महाविद्यालयांनी मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या वेबसाईटवरून प्रवेशपत्रे काढून त्यावर प्राचार्यांची सही आणि शिक्का मारून ती विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. जर हॉलतिकीटवर नावामध्ये, फोटोमध्ये किंवा स्वाक्षरीमध्ये काही चूक असेल, तर महाविद्यालये ती ऑनलाइन दुरुस्त करू शकतील. मात्र, विषय किंवा माध्यम बदलायचे असल्यास विभागीय मंडळाकडे जावे लागेल.
जर एखाद्या विद्यार्थ्याचे हॉलतिकीट हरवले, तर महाविद्यालय पुन्हा नवीन प्रत काढून देऊ शकते. त्यावर फक्त लाल शाईने द्वितीय प्रत असा उल्लेख करणे आवश्यक आहे. काही तांत्रिक समस्या आल्यास महाविद्यालयांनी तातडीने मंडळाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.







