पुणे: दिसायला नामांकित ब्रँडची चकचकीत बाटली पण आत स्वस्त दराची ‘कच्ची’ दारू टाकायचे. ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका अट्टल टोळीचा पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली असून, याचे धागेदोरे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहेत.

ही टोळी गोव्याहून स्वस्त दरातील मद्य मोठ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात आणायची. त्यानंतर पुणे, सोलापूर आणि साताऱ्यातील छुप्या अड्ड्यांवर ‘रॉयल स्टॅग’ आणि ‘इम्पेरियल ब्ल्यू’ सारख्या नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये ही दारू भरली जात असे. विशेष म्हणजे, या बाटल्यांना लावण्यासाठी त्यांच्याकडे हजारो बनावट बुच (Caps) उपलब्ध होती, ज्यामुळे ग्राहकांना ती दारू बनावट आहे, हे ओळखणे अशक्य व्हायचे. ही बनावट दारू चढ्या दराने विकून ही टोळी लाखो रुपयांची कमाई करत होती.
कांदलगाव-शहा रस्त्यावर सापळा रचून अधिकाऱ्यांनी एका संशयास्पद मालवाहू गाड्याला अडवले असता मद्याने भरलेले 25 प्लास्टिक ड्रम आणि 1,400 बनावट बुचे सापडल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत प्रेम भडवलकर आणि अक्षय देशमुखया दोघांना बेड्या ठोकल्या असून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.







