विशाल शिंदे

Bhor News: भोर तालुक्यातील शिवरे गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर अवैध गुटखा (Illegal gutkha) वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राजगड पोलिसांनी (rajgad police) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 61 लाख 27 हजार 840 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. तसेच ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
राजगड पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली होती की, शिवरे गावाजवळील राजस्थानी ढाबा येथे अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. ठिकाणी एम.एच. 04 जे.यू. 1139 क्रमांकाचा ट्रक उभा होता. ट्रक चालकाची विचारपूस केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र ट्रक मधून गुटख्यासारखा उग्र वास येत असल्याचे दिसून आले.
यानंतर ट्रक पोलिस स्टेशनमध्ये आणून पंचासमक्ष तपासला असता, ट्रक मधून RAJNIGANDHA PAN MASALA व TULSI या गुटख्याचा मोठा साठा आढळून आला आहे. या मालाची एकूण किंमत 61 लाख 27 हजार 840 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणात अश्वनी कुमार त्रिपाठी (रा. मुंबई, मुळ रा. उत्तर प्रदेश) या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 355/2025 नुसार राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर विभाग, सासवड) राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील , पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे, पो.ना. दत्तात्रय खेगरे, पो.शि. योगेश राजीवडे, महिला पोलीस प्रर्मिला निकम, पोलीस अंमलदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, अजय चांदा यांनी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.







