पुणे, ता. 25: भोर तालुक्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे आदेश न्यायाधीश एस.एम. टाकळीकर यांनी दिले आहे. आरोपी बजरंग रामचंद्र खोपडे (वय 32, रा. तेलवडी, ता. भोर, जि. पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर प्रकार नोव्हेंबर 2018 साली घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिला धमकावत अत्याचार केला आहे. 29 मार्च 2019 रोजी मुलीची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी फिर्यादी यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी बजरंग खोपडे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376(3), 506 तसेच पोक्सो कायदा कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला 30 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होता.
या खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बजरंग रामचंद्र खोपडे याला वीस वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड शिक्षा, भारतीय दंड संहिता कलम 506 खाली एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने तब्बल 11 साक्षीदार तपासले आहे. हे आदेश न्यायाधीश एस.एम. टाकळीकर यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांना राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर .जी. राठोड, फौजदार विद्याधर निचित, सहाय्यक फौजदार साहेबा बाबर यांना बहुमुल्य मदत मिळाली.





