अमित मुंडीक

पुणे: सिंहगड रोड परिसरातील PMAY सोसायटीतील (Pune News) एका बहुमजली इमारतीत बाल्कनीत पेटलेल्या कोळशामुळे आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नवले अग्निशमन केंद्राला दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 वाजता आग वर्दी प्राप्त झाली होती. अग्निशमन दलाचे वाहन 12:47 वाजता घटनास्थळी दाखल झाले.
A विंग, फ्लॅट क्रमांक 68, PMAY सोसायटी, सिंहगड बिल्डिंग, चूल आंगण हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या G+12 मजली RCC इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीत ठेवलेला पेटलेला कोळसा गॅलरीतील साहित्याला लागल्याने आग भडकली. यामध्ये बाल्कनीत ठेवलेल्या सिलेंडरच्या कॅपलाही आग लागली होती. मात्र अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग पूर्णपणे विझवली.
घटनास्थळी पीएमआरडीए व नवले अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली असता बाल्कनीतील अडगळीचे साहित्य, थोडे फर्निचर, कपडे आणि इलेक्ट्रिक वायरिंगचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. जळालेल्या सिलेंडरची कॅप बदलून तो सिलेंडर फ्लॅटच्या बाहेरील मोकळ्या जागेत ठेवून संभाव्य धोका दूर करण्यात आला. तसेच घरमालकाला संबंधित सिलेंडर बदलून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याची खात्री करून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावरून परतले.







