पुणे: पुण्यातील वन विभागात लाचखोरीचा मोठा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला असून,वर्ग 2 अधिकारी असलेले वनक्षेत्र सर्वेक्षक उदयसिंग भिमराव कुंभार (वय 46) यांना 4 लाख रुपयांची लाच (Pune Bribe News) स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 29 मार्च 2026 रोजी केली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. वडगाव मावळ तालुक्यातील चिखलसेगाव, आपटी आणि कुणेणामा या गावांतील काही जमिनींच्या 7/12 उताऱ्यावर लागलेले खाजगी वनाचे शेरे काढून टाकण्यासाठी महसूल विभागाने ‘रिस्टोर्ड ऑर्डर’ दिल्या होत्या. या संदर्भातील 11 आदेशांच्या प्रती मिळवण्यासाठी तक्रारदारांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी उपवनसंरक्षक कार्यालय, सेनापती बापट रोड, पुणे येथे अर्ज केला होता.
यानंतर 04 मार्च 2026 रोजी ते चौकशीसाठी कार्यालयात गेले असता त्यांचे काम वनक्षेत्र सर्वेक्षक उदयसिंग कुंभार यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांनी कुंभार यांची भेट घेतली असता त्यांनी 11 पैकी 7 रिस्टोर्ड ऑर्डर उपलब्ध असल्याचे सांगून त्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदारांनी 13 मार्च 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरो, पुणे येथे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता कुंभार यांनी तडजोड करत 4,00,000 रुपये घेण्याची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. 29 मार्च 2026 रोजी दुपारी 12:35 वाजता आरणेश्वर चौक परिसरात, पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डियालॉजी सेंटर आणि वाय के वडेवाले हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर कुंभार यांनी तक्रारदाराकडून 4 लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.






