Pune Cyber Crime: पुणे : शेअर बाजारातील गुंतवणूक आणि ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी शहरातील दोन तरुणांची एकूण 51 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा- सातबाऱ्यावर आता पत्नीचेही नाव! शेतात घाम गाळणाऱ्या माऊलीला अखेर मिळणार मालकी हक्क
पहिला प्रकार मांजरी खुर्द परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला आहे. सप्टेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी या तरुणाशी संपर्क साधत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आणि खात्रीशीर परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर गुंतवणूकविषयक अॅपवर नोंदणी करण्यास त्याला भाग पाडण्यात आले. सुरुवातीला कमी रकमेवर परतावा देत चोरट्यांनी तरुणाचा विश्वास संपादन केला. विश्वास बसल्यानंतर तरुणाने वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात एकूण 46 लाख 33 हजार रुपये जमा केले. काही काळानंतर परतावा मिळणे थांबल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे तपास करीत आहेत.
दुसरा प्रकार सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला आहे. सायबर चोरट्यांनी घरातून ऑनलाइन कामाची संधी असल्याचे सांगून त्याच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला छोटे टास्क देऊन त्याचे पैसे खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे विश्वास बसल्यानंतर अधिक पैसे गुंतविल्यास जास्त परतावा मिळेल, असे सांगून तरुणाला जाळ्यात ओढण्यात आले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात एकूण 4 लाख 83 हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शेअर बाजारातील खात्रीशीर परतावा किंवा घरातून ऑनलाइन कामाच्या आमिषाला बळी पडू नये, कोणत्याही अॅपवर गुंतवणूक करण्यापूर्वी खातरजमा करावी आणि अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.






