पुणे: खराडी परिसरात दारू पिल्यानंतर (Pune Crime) झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाटली आणि दगडाने डोक्यात मारहाण करून तरुणाची हत्या करण्यात आली असून खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

आकाश तरळे वय 23 रा. खांदवेनगर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय ऊर्फ जलवा संजय वाघमारे वय 23 रा. राजाराम पाटीलनगर, खराडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री सव्वा 9 च्या सुमारास खराडी येथील स्वीट इंडिया चौक परिसरात घडली. याप्रकरणी अमित भोसले यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भोसले, विजय वाघमारे आणि आकाश तरळे हे तिघेही मित्र होते. त्यांनी एकत्र दारू प्यायली होती. त्यानंतर तिघेही स्वीट इंडिया चौकात बसून गप्पा मारत होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि संतप्त झालेल्या विजय वाघमारे याने त्याच्याकडील बाटली आकाशच्या डोक्यात मारली. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून आकाशच्या डोक्यात घातला.
या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी विजय वाघमारे याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करत आहेत. परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.







