PMC Election: पुणे: आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या प्रभागात आता धंगेकर विरुद्ध आंदेकर असा थेट सामना रंगणार आहे. शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात सोनाली आंदेकर (Sonali Andekar’s personal property) उभ्या असून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सोनाली आंदेकर यांची वैयक्तिक मालमत्ता
दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे सोनाली आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक माहिती समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार सोनाली आंदेकर यांच्याकडे 62,150 रुपये रोख स्वरूपात आहेत. त्यांच्या इंडियन बँकेच्या खात्यात 23 लाख रुपये शिल्लक असल्याची नोंद आहे. तसेच युनियन बँकेत 93,740 रुपये आणि इंडियन बँकेतील दुसऱ्या खात्यात 10,000 रुपये जमा आहेत. याशिवाय महेश महिला पतसंस्थेत 5 लाख रुपयांच्या चार ठेवी असून त्यांची एकूण किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.
सोनाली आंदेकर यांच्या नावावर एक अॅक्टिवा दुचाकी आहे. त्यांच्याकडे 3 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 3 लाख 93 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच वनराज असोसिएट्स या फर्ममध्ये 2 लाख रुपयांची गुंतवणूकही करण्यात आली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार सोनाली आंदेकर यांच्या नावावर 71 लाख 71 हजार 217 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. कुटुंबाची जंगम मालमत्ता 57,71,740 रुपये इतकी दाखवण्यात आली असून एकूण मालमत्ता 1 कोटी 29 लाख 42 हजार 957 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 62,150 रुपये दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, आंदेकर कुटुंबातील सदस्य लक्ष्मी आंदेकर या देखील निवडणूक रिंगणात असून त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता 1 कोटी 38 लाख 65 हजार 638 रुपये असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मधील लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.




